Friday 4 September 2015

एका कवितेची ओळ. . . !


आपल्याच कवितेची एखादी मधली ओळ
अनोळखी होऊन येते. .
आपल्याच ओठांवर. . 
पियानोवर फिरणा-या सराईत बोटांसारखी
वाजत राहते तिची शीळ. .
कानामागून . . . दिवसभर. .
पहाटेच्या गजरच ताडकन जागवतो
तिचा पहिला शब्द. .
आणि मग इथूनच सुरू होते तिची ठरलेली "दिनचर्या. ."
कुठल्याही पिनेशिवाय घट्ट बसणा-या अंबाड्यात
रुतून बसते एखादी लाघट ओळ…
परसातल्या कलमी गुलाबासारखी. .
फरशीवरच्या केरातून सुपलीत येतोच
एखादा नकोसा शब्द.
आणि फेकला जातो. . दूरवर. .
जिथून त्याला कवितेचे अंगणसुद्धा दिसत नाही. .
फडताळातल्या डब्यामधला सवयीचा साखर शब्द मात्र
मोजून मापून टाकतेच ती
शब्दांच्या उकळत्या आंधणात. .
कडू-गोड सगळं प्रमाण जपावं लागतंच ना तिला इथंही. . !
परातीतल्या पिठामध्ये किणकिण हात मळत राहतात
एकजीव, एकसंध. . .
शब्दांमधले सगळे अर्थ. .
आणि मग नरम नरम ओळ फुलते
गरम गरम चटके सोसून. .
अर्थ वगैरे असला तरी भाजल्याशिवाय कुठे कळतो. . .?
धुणी-भांडी सणवार, हस-या मुखी पाहुणचार
दुखलं-खुपलं. . रुसवे राग. . चोवीस तास कामाला लाग
असं सगळं करता करता
एकेक ओळ निसटूनच जाते
मऊशार हातामधून. .
सुईत रुतल्या बोटामधून.
अंधारातल्या, रात्रीमधून . .
अर्ध्या-मुर्ध्या स्वप्नामधून
शांतपणे. . निमुटपणे. . . कुणालाही न कळता. . . !
आणि मग दुस-या दिवशी…
आपल्याच कवितेची एखादी मधली ओळ
अनोळखी होऊन येते
आपल्याच ओठांवर. . .

1 comment:

  1. असं सगळं करता करता
    एकेक ओळ निसटूनच जाते
    मऊशार हातामधून. .
    सुईत रुतल्या बोटामधून.
    अंधारातल्या, रात्रीमधून . .
    अर्ध्या-मुर्ध्या स्वप्नामधून
    शांतपणे. . निमुटपणे. . . कुणालाही न कळता. . . !
    आणि मग दुस-या दिवशी…
    आपल्याच कवितेची एखादी मधली ओळ
    अनोळखी होऊन येते
    आपल्याच ओठांवर. .
    Kasal Sundar na

    ReplyDelete