Tuesday 8 September 2015

बाबा…

दिवस कसा मी एकच ठरवू त्याच्यासाठी
जो झिजतो रात्रंदिन माझ्या सौख्यासाठी
ज्याच्या नशिबी सदैव होती पानगळ तरी,
उन्हातला होता गुलमोहर बाबा माझा...

इवल्या पायांनी घरभर मी दुडदुडताना
त्याने होते सावरले मज अडखळताना
आजही असतो सोबत माझ्या सावलीपरी
आणिक ठेवी हात पाठीवर बाबा माझा...

ओढीत गेला संसाराचा अवजड गाडा
चुकला नाही ज्याचा तडजोडीचा पाढा
पुरवायाचा तरी हट्ट जो माझे सारे
ठेवून इच्छा स्वप्नांच्यावर बाबा माझा...

भ्रांत घरातुन दोन वेळच्या घासाची... पण,
जळायचा तो रोज जसे की, चुलीस सरपण
अर्ध्यापोटी झोपायाचा बरेचदा तो
माझ्यासाठी ठेवून भाकर बाबा माझा...

रडला नाही कधीच पण आतून घुसमटे
भरुन येता मुकाट सगळे साहि एकटे
हसायचा तो मनात कोंडुन लाख वादळे
झुरायचा हो रात्ररात्रभर बाबा माझा...

जराजरासा रागिट तरीही प्रचंड हळवा
अजूनही मज निजवायाला फक्त तो हवा
मित्र, सोयरा, सखा, यार जो सगळे झाला
सुखासही तो लावी झालर बाबा माझा...

पूजा भडांगे बेळगाव 

No comments:

Post a Comment