Saturday 5 September 2015

सावळबाधा. . .

अलवार वाजवित वेणू 
तो स्वप्नफुलांवर आला 
अन रंग सावळा माझ्या 
डोळ्यांवर सोडून गेला. . .

क्षितिजावर निळसर रेघा 
गोंदून जराश्या हलक्या 
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .

मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .

भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. . .

बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .

हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .

मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .

ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .

मी ओढून घ्यावा म्हणुनी
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . . 

-पूजा भडांगे बेळगाव 


13 comments:

  1. छान...सुरेख... अप्रतिम लिखाण . ताई

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. तुमची ही सुंदर कविता whats app वर इंदिरा संतांची म्हणून फिरतेय.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes
      But tase hone ha suddha khup motha gaurav na

      Delete
  4. Khupch chan..Didi..krushn an Radhech Darshn zalysarkh vatl

    ReplyDelete

  5. मज झाली सावळबाधा
    मी झाले ना रे राधा. . ?
    तो ऋतू जीवघेणा पण,
    स्पर्शात शहारून गेला. . .

    ती शामनिळाई ल्याली
    वेगळीच होती सांज
    तो कातरवेळी ऐसा
    मोरपीस फिरवून गेला. . .

    मी ओढून घ्यावा म्हणुनी
    जाताना माझ्यासाठी
    कालिंदीच्या काठावर
    तो शेला विसरून गेला. . .
    Tai khup khup Sundar

    ReplyDelete
  6. हि कविता कोणी लिहिली आहे ?

    ReplyDelete
  7. माझ्या माहितीप्रमाणे ही कविता इंदिरा संत यांची आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शेला

      निर्मळ निर्भर वातावरणी
      धुके तरंगे धूसर धूसर
      झगमगते अन नक्षी त्यावर
      सोनेरी किरणांची सुंदर
      थंड गुलाबी कार्तिकातला
      हवा हवासा स्पर्श तयाचा
      सुगंध त्याला नाजूक नाजूक
      नव्या उमलत्या बूच फुलांचा
      चारुदत्त हा कोण कोठुनी
      अंगावरला फेकीत शेला
      वसंतसेना वसुंधरेने
      झेलून तो हृदयाशी धरला

      ही कविता इंदिरा संतांची आहे.

      Delete
  8. पूजाताई, किती आनंददायी गोष्ट आहे ही की, ही कविता लोक इंदिरा संतांची म्हणून वाचतात. हा गौरव वाटतो मला.. मला वाईट वाटलं नाही उलट कौतूक वाटलं या कवितेसाठी अभिनंदन तुझं ...
    आगे बढो..

    ReplyDelete