Friday 4 September 2015

प्रॉमिस... !

पूर्वी एक बरं होतं, मी काहीही लिहीलं, बोललं किंवा गुणगुणलं की त्यांचे नेमके संदर्भ माझ्याशिवाय कुणालाच कळून येत नसत.. अगदी ते ज्याच्यासाठी आहे त्यालाही.. त्यामूळे मी त्या अवस्थेला आत्मसुखाचं गोंडस नाव देऊन मोकळी व्हायचे.. अगदी शेवटपर्यंत त्याचा राखून ठेवलेला अर्थ फक्त माझ्याभोवतीच फिरायचा अन् शेवटी दमून-भागून अलगदपणे माझ्याच कुशीत शिरायचा.. पण आता माझ्या अर्थांनाही आपलं माणूस चांगलंच ओळखता येतंय बरं का.! 

तू परवा म्हणालास ना की, "तूला स्वतःला खोटा दिलासा द्यायची सवयंच लागलीये.. "मान्य मी देते स्वतःला दिलासा.. खोटी का होईना पण समजूत काढते स्वतःची.. कारण हक्काने कुणापाशी मोकळं व्हावं, मन भरेपर्यंत रडून घ्यावं असं आजपर्यत कुणीच नव्हतं.. मी माझी सोबती होते. पण तुझ्या या वाक्याने मात्र ते कुणीच नसणं हळूहळू धूसर होत गेलं. तुला माझ्या आवाजातील कंपही हल्ली जाणवतोयं.. माझ्या मौनातली अस्थिरता तुझ्या गावी पोहोचते.. मी खूप खूप हसले की नक्कीच काही बिनसलंय हे सहज तुला कळतं.. जिला निव्वळ गर्दीचा भाग होऊन त्यात स्वतःला हरवून घ्यायला आवडायचं तिला तू बोट धरून आपलेपणाच्या गावात आणलंस.. हे सगळं माझ्यासारख्या एकलकोंडीला खूप सुखावह असलं तरी तुलाच म्हणून सांगते,फार मनकवडं असणंसुध्दा वाईटच.. "तुझ्यासाठी मी आहे." हे वाक्य किती सहज बोलून गेलास होतास तू तेंव्हा.. त्या दिवसापासून भिती वाटते की तुझ्यासारख्या कोवळ्या मनावर माझ्या आयुष्यातील कुठल्याचं जखमांची सावलीही पडायला नको.. कारण अतिजवळीक माणसाला प्रत्येक बाबतीत ग्रुहित धरत असते. 

तुझ्या विस्तारलेल्या जगण्याच्या मी एक बिंदू बनून असेन कुठेतरी.. नाही असं नाही.. पण फक्त मला केंद्र मानू नकोस.. कारण मध्यावरुन उठणारी वलयं देखणी दिसत असली तरी त्यातून निघणा-या वेदनेचा तरंग शेवटापर्यंत धावत जातो.. आणि मग ते सगळं नकोसं वाटायला लागतं.. म्हणून तुझ्या कुठल्याचं क्षणावरून ते अभद्र तरंग कधीच वहायला नकोत.. व्यक्त होण्यावर जमल्यास आवर घालेन आणि माझ्या मनाची समजूत काढत जाईन पुर्वीसारखीच पण तुला त्याची झळ लागू देणार नाही..

No comments:

Post a Comment