Wednesday 18 March 2015

प्रश्नकिनारा...



कोळ्याच्या  जाळ्याप्रमाणे दुरवर फेकलेला. . अथांग, निळाशार समुद्र पाहिला की मला गलबलून येतं रे उगीच. .खूप माया येते त्या समुद्राची. .
कुठवरं पोहोचायचं असेलं त्याला...? नेमका कोणता तळ गाठायचा असेल...? आणि असं कोणतं दुःख आहे की ज्यात अश्रू ढाळून तो इतका खारा झाला असेल. . ? असे कित्येक प्रश्न तरंगायला लागतात रे मनावर. . . एखाद्या नावेसारखे...
वाळूवर उमटतं जाणा-या ओल्या पाऊलखुणेसारखे...!

अवघा निसर्ग एकवटलेला असतो माझ्या डोळ्यांसमोर पण, मावळतीला जाण्यासाठी आसमंताची जी लगबग चाललेली असते ना, ती खरंच पहावत नाही मला. . क्षितिजाला टेकलेला लालबुंद सूर्य अन त्यावर पसरलेली निरव शांतता कुजबुजत असते काहीबाही.. त्या शांततेतही एक मंद असा सूर ऐकू येतो बघ, विझू जाणा-या एखाद्या कोवळ्या प्रकाश किरणाचा. .
देव्हा-यातला दिवाही शांत होताना हाच सूर आळवत असेल का रे..?

उन्हाचा एकेक किरण पुसट होतं जाताना तो प्रकाशाचा सूरही विरत जातो ना सावळ्या आसमंतात. . . पण, तरीही कुठलंस उदास गाणं मागे राहतंच… चालून चालून दमल्यावर किना-याच्या टोकाशी वाळूत पाय खुपसून बसलं की ते गाणंही ऐकू येतं. . . आपलाही सूर त्यात मिसळतो. . दोन गाणी वाजत राहतात त्या लांबलेल्या किना-यावर. . लाटेवरून तोल सावरत चालणारा वारा कुठली जलपरीक्षा देत असतो, कोण जाणे.! कदाचित उनाड, सैरभैर, चंचल, बेभान ही विशेषण पुसण्यासाठीचा आटापिटा असेल त्याचा.. हो नं. . ?
समुद्राच्या कणाकणाला ढवळून काढून गर्भार राहिलेलं पाणी रोज हजारो लाटांना जन्माला घालून किना-यावर सोडत देतं असतं. . त्यातही एखादी लाघट, हळवी लाट पाण्याचा पदर धरून जाऊ पाहते समुद्रात. . पण, पुन्हा तिला फरफरट आणलं जातं किना-यावर. . . एखादीला फेकलं जातं आपल्याच अंगावर रागाने... तर एखादीला आतल्या आतंच गुदमुरून मारलं जातं...
अनेक, असंख्य म्रुत लाटा फेकल्या जातात इकडून तिकडे... काहीश्या अर्ध्या जिवंत, टाहो फोडत राहतात आपल्या गाजेतून... आक्रंदत असतात अनाथपणाच्या जाणिवेने...

त्या भेसूर गाजेचा, लाटांच्या विव्हळण्याचा आवाज मला गाण्यासारखा वाटावा..? ?
याहून वाईट काहीच नसेल रे माझ्यासाठी..
एखाद्याचा हुंदकाही मला ऐकू येत नसेल तर माझ्या कानांनी मुकाट्याने बहिरेपणं स्विकारावं.. अशा दिखाऊ अवयवांनी निकामी राहिलेलंच बरं ना..!

आताशा उमगतयं बरंच काही. .
जुने प्रश्न सुटतं जातायेत एका निगरगाठीसारखे. . .
लाटांचा आक्रोश सहन होणार नाही म्हणून आभाळ मावळतीला जायची घाई करतंय. .
या समुद्राला पोहचायचयं त्या क्षितिजाच्या शेवटच्या टोकापर्यंत. . जिथे मिळेल त्याला त्याच्या कर्माचं प्रायश्चित. . . जिथे मिळेलं प्रत्येक लाटेला न्याय. . क़दाचित. । त्याला गाठायचाय तळ स्वतःमधलाच. . जिथे नसेल एकही खारेपणाचा थेंब. . .
तो अजूनही शोकात आहे आपल्या हजारो-लाखो लाटांच्या ज्यांना त्याने स्वतःच जन्मा घालून पोरकं केलं आणि तरिही येणा-या प्रत्येक भरतीसहित तो तयार असतो एका नवीन लाटेला जीवे मारण्यासाठी. .

हे प्रश्न सुटले तरी खरा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे, की खरी माया कुणाची..?

आधीच मेलेल्या लाटांचं ओझं उरावर घेऊन जगणा-या खा-या समुद्राची...? की पोरकेपण नशिबी येताना लाटेने गिळलेला प्रत्येक अश्रू आपल्या आत सामावून घेऊन प्रत्येकीला पोटाशी धरणा-या किना-याची....??

पूजा भडांगे https://www.facebook.com/

No comments:

Post a Comment