Monday 7 September 2015

"एक जुनी कविता आठवली……"



सातवीतल्या वर्गामध्ये होते तेंव्हा सुचलेली 
एक जुनी कविता आठवली आईवर मी लिहिलेली… !

कपाटातल्या जुन्या वहीच्या कुठल्याश्या पानावरती 
पहिल्यांदा सुचलेली कविता कोरुन मी लिहिली होती…
अजूनही मज आठवते ती ओळ मनाला स्फुरलेली...
एक जुनी कविता आठवली........

शाळेमध्ये प्रकल्प होता "लिहा आईवर मनातले"
भरभर सगळ्या मित्रांनी मग कागद शब्दांनी भरले
मला न उमजे काय करावे पाहुन पाने भरलेली...
एक जुनी कविता आठवली………………

तास संपला, सुटली शाळा तरि वहीचे पान दिसे
को-या पानावरच्या रेषांमधुनि "आई" नाव दिसे
घरी परतले तरी मनातुन होते हरवुन गेलेली...
एक जुनी कविता आठवली.......

चिनु म्हणाला आई माझी आहे प्रेमळ अन् साधी
सुमी म्हणाली माझी आई तर उठते सगळ्यांआधी
या सगळ्यातुन कशी लिहु मी आई माझी नसलेली...
एक जुनी कविता आठवली........

गहिवर आला, श्वास कोंडला पाणी भरले डोळ्यात
असे वाटले नको अता हे पुन्हा निजावे गर्भात
तरी हाक ही माझी माझ्यापुरती केवळ उरलेली...
एक जुनी कविता आठवली........

चंदनमाला ल्याली तस्बीर आईची भिंतीवरती
दिवा शांत उजळतो त्यापुढे मंद फुलवुनि फुलवाती
एका जागी अनेक वर्षापासून आई बसलेली
एक जुनी कविता आठवली.......

त्या रात्री मी रडले हमसुन आईच्या फोटोजवळी
कुशीत घेउन शांत कराया कोणिच नव्हते त्यावेळी
तेंव्हा कळले ज्याला असते आई "तो" वैभवशाली...
एक जुनी कविता आठवली........

त्या रात्रीनंतर मी माझ्या मनास एकच सांगितले
सय दाटुन येता आईची व्हायचे न कधि गहिवरले
कागद घेउन, कल्पुन लिहिली मग आई मी सुचलेली...
एक जुनी कविता आठवली........

पान वहीचे भरले आईवरच्या प्रेमळ शब्दाने
बोटे फिरवत अक्षर अक्षर टिपले मीही मायेने
त्यादिवशी कवितेतून माझी आई जन्मा आलेली...
एक जुनी कविता आठवली........


पूजा भडांगे बेळगाव 

1 comment: