Thursday 19 March 2015

तुझं आभाळ...


तुझ्या आभाळात मला असेल का रे थारा..? 

जर असेल ना तर तसं आधीच सांग, 
म्हणजे मी भर पावसात येईन
तुला भेटायला. . . 
एखादी सावळी सर होऊन... 
रिमझिमती... थरथरती....! 
वेलीफुलांच्या सांदीतून 
हिरव्याकंच स्पर्षाने छपरावर उतरेन 
अन् अगदी तालात, घरंगळत येईन 
तुझ्या खिडकीपाशी... 
पण, मला तेंव्हा सावरायला तूच असशिल नं..? 

असशील ना. . ! 
तर, मग एक काम कर. . 
एकाच हाताने नको सावरूस. . 
दोन्ही हातांची ओंजळ पसर वर आभाळाच्या दिशेने. . 
तुझ्या उबदार हातात उतरेन मग मी हळूवार. . . 
पापणीच्या काठावर खुळी स्वप्न उतरतात ना, 
तशीच. . . .! 

माझा थेंबनथेंब गोठवून घेईन मी 
तुझ्या तळहातावरच्या तिरप्या रेषांवर. . .
ओलेत्या ओंजळीत विसावताना माझं मी-पण देखील आपसूक विरघळून जाईल ना रे त्यात. .? 

विरघळलंच तर मिटून घे भरली ओंजळ 
पापणीसारखीच. .
मी असेन त्यात सुखरूप... कुठेतरी. .!

तुझ्याशी एकरूप होण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता उपाय असेल तर तोही सांगून ठेव. . 
पण आधी सांग,
.
.
तुझ्या आभाळात मला आहे का रे थारा..? 

आहे का. . ?

-पूजा भडांगे, बेळगाव 

1 comment: