Thursday 10 September 2015

"दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . . "

केशर शिंपीत हलक्याने आभाळी कातरवेळ सजावी. . . 
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
हळू हळू सूर्याने जावे क्षितिजाच्याही खाली खाली
आणिक त्याचे रंग लालसर पसरावे सा-या भवताली
या रंगांच्या सोहळ्यातुनी रम्य कोवळी वेळ फुलावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
झाडांच्या पानातून भिनतो मत्त सुगंधित धुंद गारवा
शीळ वाजवित मंजुळ घरट्याकडे परत येताच पारवा
याच क्षणाला अपुल्या ओठांवरती आठव-गाणी यावी
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
तांबुसल्या मातीची ओंजळ भरता कातरश्या मायेने
समजुन घ्यावे सांजपाहुणी आली शकुनाच्या पायाने
तिच्या स्वागताला तुकयाची एक छानशी ओवी गावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
प्रत्येकासाठीच खास असतोच प्रहर हा रोज रोज पण,
प्रत्येकाने कुठेतरी अनुभवले असतील असे खुळे क्षण
याच क्षणाला आठव-वेडी आनंदी पाने चाळावी. . .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .
कुठे जपाची माळ थरथरे कातर हाती शामलवेळी
कुणी परवचा म्हणते आणिक कुण्या घरी भजनाच्या ओळी
देव्हा-यातुन मंद दिव्याची त्या समयी समई लागावी. .
दार उन्हाचे मिटता मिटता क्षितिजावरती सांज खुलावी. . .

3 comments:

  1. नितांत सुंदर शब्दरचना . केवळ आनंद

    ReplyDelete
  2. खुप आवडली कविता. तालात वाचता येते. सुंदर चित्रण.लहानपण आठवले.

    ReplyDelete
  3. प्रत्येकाने कुठेतरी अनुभवले असतील असे खुळे क्षण
    Mast

    ReplyDelete