Thursday 10 September 2015

शाळेची वाट....



आणि मग माझं नाव मोठ्या शाळेत टाकलं. तशी मी आधीपासूनच (अति) हुषार.. ;-) दोन वर्ष बस्तीतल्या बालवाडीत न रडता जायचे. सगळी गाणी म्हणायचे पण एकदाच कुठल्याकी पोरानं माझी पेन्सिल खाल्ली म्हणून त्याच्या पाठीत दणका दिलेला, तेवढीच काय ती तक्रार.. ! पण, तरीही बे चे पाढे तीसपर्यँत पाठ म्हणून मला मोठ्या मुलींच्याच शाळेत घालायचा निर्णय घरात एकमतानं घेतला. मुलींच्याच.. कारण, तिथं आणि कुणी माझी पेन्सिल खाल्ली तर समोरून पडणारा उलटा मार मला झेपणारा असेल.. निव्वळ या काळजीपोटी..! पण, सुदैवाने पुढे कुणी माझी पेन्सिल खाल्ली नाही. त्यामूळे ती चिंताच मिटली..
तर महिला विद्यालय सारख्या मोठ्या शाळेत आपण शिकणार याचा आनंद तर होताच पण आमच्या इकडे २९ मे म्हणजे २९ मे लाच शाळा सुरू होतात.. त्यामुळे "तुझा वाढदिवस असतो ना म्हणून आजपासून शाळा सुरू होतात" असं कुणीतरी सांगितलेलं म्हणून मी अजून जरा हवेत होते.
आमची नुसती मुलींची शाळा.. एकपण पोरगा नाही.. शिकवायला पण नाही.., सगळ्याच लेडीज टीचर, निळा फ्रॉक आणि शाळेच्या अंगणात प्राजक्ताचं झाडं.. पहिल्यांदा शाळेचा हा अनुभव घेतला तेंव्हा शाळेत सोडायला आजोबा आलेले.. त्यानंतरही रोज यायचे.. वर्षभर.. कारण, घरापासून शाळा खूपशी लांब नसली तरी महिला विद्यालय गाठायला कॉलेज रोड चा भला मोठा ट्राफिक ओलांडून जावं लागायचं, तशी शाळेच्या पहिल्या दिवसाची खास अशी आठवण आठवत नाही, कारण मी अतिहुषार असले तरी कमालीची विसर"भोळी" आहे म्हणून.. :-P
असो,
पण, शाळेला जाताना बोगारवेसेतल्या म्हणजे धर्मवीर संभाजी चौकातल्या घड्याळाला वळसा घालून कॉलेज रोडमार्गे शाळेकडे जाणारी एक आठवण मात्र ठळक आठवते.. तेंव्हा मी वयाने लहान तरी माझ्या चालण्यातली गती वेगवान होती.. पण माझ्या आजोंबांच्या वाढत्या वयाच्या थकव्यामुळे त्यांची गती जरा हळूच होती.. थांबून थांबून चालायचे. अर्धा पाऊण तास तरी लागायचाच शाळेत पोहोचायला... (आता मी १५ मिनीटात शाळा गाठते ही गोष्ट निराळी..)

तर तो हायवे रोड असल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी सगळा फुटपाथ तांबड्या टाईल्सनी बनवलेला होता. रोज एवढं चालायची सवय नसल्यानं सुरूवातीला फार फार दमायला व्हायचं. इतकं की पाण्याची बाटली वाटेतंच रिकामीच व्हायची.. मग माझं गाणं चालू..
"बाबा, मला उचलून घ्या.."
आजोबा स्पष्ट म्हणाले.
"उचलून घेतो, पण शाळेत नेणार नाही.. फिरवून आणतो तुला मिलेट्री महादेवला" माझा मूड गेला.
मला फिरणं नको होतं पण आता चालणंही होईना.. मोठ्या शाळेत शिकायची भारी हौस ना आणि आजोबांचे शब्दही कानावर होतेच..
छोट्या छोट्या चौकोनी टाईल्स तुडवत जाताना पाढे म्हणायचीही सवय त्यांनीच घालून दिली. त्यामुळे २८व्या पाढ्याला कधी शाळेचं गेट यायचं कळायचंच नाही.
या सगळ्यातूनही "तुला तुझी वाट दाखवलीय.. वेळ लागेल, दमही लागेल पण तुझी वाट तुझी तुलाच चालत जावी लागेल.." असं काहीतरी ते तेव्हा मला न बोलता, न दुखावता बोलून गेलेले.. आताही शाळा म्हटली की हे सगळं आठवतंच आणि आजही शाळेच्या वाटेने जाताना हे शब्द कानावर येतातच...

पूजा भडांगे बेळगाव 


No comments:

Post a Comment