Monday 30 March 2015

निर्मोही...


असे दुःख दे तू मला  भरजरी रे
जिथे वेदनेची कलाकूसरी
पदर गूढ रंगी असो प्राक्तनाचा
जखमही सजो आज कायेवरी. . .

जरी जाळते रोज मी जीवनाला
क्षणांवर खुळ्या नोंदवुनी गुन्हा
नको हात घालू निखा-यात माझ्या
उगा खाक होशील तुही पुन्हा. . .

सजो वाट काट्याकुट्यांच्या किनारी
भरो रक्तिमागंध पाऊलखुणा
तुझी टाचणी लाव या जाणीवांना
गळो त्यातला सर्व हळवेपणा. . .

बनो पत्थरासम हृदय आज माझे
नको पाझरांच्या तयातुन सरी
नको त्यात संवेदना, प्रेम, माया
नको तो जिव्हाळा, उमाळा उरी. . .

फुटो भाग्य अन् मी करंटी ठरो अन
शिव्या-शाप लेऊन ओंजळ भरो
नको लाच कुठल्या सुखाची अता रे
तुझी एक अवहेलना... बस्स, पुरो. . .

उरो फक्त अंधार चारी दिशांना
तमाच्या तळाशी मला जाऊदे
मना-आतही गर्द काळोख इतुका
मनालाही अंधत्व या येऊ दे. . .

पूजा भडांगे

1 comment: