Friday 20 March 2015

एक सोनुली...


"एक सोनुली..."

एक सोनुली
घराघराच्या
कोप-यातुनी
अशी धावते,
दुडदुडताना
पायामधला
घुंगूरवाळा
खुळखुळ वाजे...
खळखळणा-या
झ-यासारखा
प्रसन्न चेहरा
तिचा हासतो,
शुभ्र फुलांवर
विसावलेल्या
फूलपाखरा-
-समान दिसतो..

धावत धावत
इवले पाऊल
उंबरठ्याशी
हळूच येता,
ओलांडुन ती
माजघरातील
मेजावरती
चढून बसते..

नुसती चुळबुळ
चंचल अवखळ
मेजावरूनी
हळू उतरते,
धावत जाऊन
आजोबांच्या
खुर्चीवरती
ऐटीत बसते...
तिपईवरचा
चष्मा घेऊनी
हळूच पाहुन
इकडे तिकडे,
कुणी न पाही
तिला समजता
डोळ्यांवरती
अशी चढवते..
नक्कल करते
आजोबांची
पेपर घेऊन
वाचत बसते,
गालावरची
तीट काजळी
हास्यकळीतून
पुन्हा हासते..

मंद स्वराचा
शुभंकराचा
देवघरातून
आवाज येता,
पुन्हा लाडली
धावत धावत
आज्जीपाशी
जाऊन बसते...
क्षणाक्षणाला
सरकत जाते,
माळ जपाची
थकल्या हाती,
आज्जीसंगे
ताल धरूनी
बोल बोबडे
अभंग गाती..
मिटले डोळे
हळुच मिचकत
पुन्हा पाहुनी
इकडे तिकडे,
ताटामधला
प्रसादातला
लाडू उचलुन
पुन्हा धावते..
आज्जी देई
हाका आतुन
"जपुन जा, गो..!"
माझ्या चिमणा..!
धडपडशिल तू
पळता पळता
अडखळशिल अन्
पडशिल सोना..!

परी न ऐके
धावत जाते
पाकघराच्या
ओट्यापाशी,
जरा थांबुनी
आईजवळी
पिंगा घाली
ती पदराशी...
उचलुनिया मग
सोनपरीला
आई घेते,
माया करते.
अन् छकुलीच्या
हस-या गाली
तीट लावूनी
द्रुष्ट काढते..
तोच अचानक
दारामागुन
आवाज येतो,
बेल वाजते.
"छकुली.. राणी.."
हाक ऐकुनी
लेक गोडुली
धावत सुटते..
" बाबा, बाबा !"
म्हणते, हसते
थकला बाबा-
-देखिल हसतो,
मुके घेऊनी
लाड करूनी
थकवादेखिल
पळून जातो..

अशी सोनुली,
गोड गोडुली
घराघराला
घरपण देते...
घरभर घुमते,
उधळत् खिदळत
चिऊताईचे
गाणे गाते..
आई पाही
कौतुक सारे
दाराआडून
आणिक हसते,
भरवायाला
दोन घास मग
तिच्यामागुनी
धावत फिरते...
लपते राणी
पड्द्यामागुन
आडुन पाहुन
पुन्हा हासते,
पुन्हा जाऊनी
अंगणातल्या
तुळशीमागे
लपुन बसते...
शेवट शेवट
कसेबसेतरी
घास भरवते,
आई तिजला
बाबा येतो
घेऊन जातो
कुशीत घेऊन
निजवायाला..

खिडकीपाशी
बोट करूनी
सोनपरीला
बाबा म्हणतो,
" चंदामामा
लिंबोणीच्या
झाडामागुन
हळुच येतो..."
तुहि, झोप ना..!
सोन्या ! आता..
खेळून खेळून
दमला असशिल..!
सोनू म्हणते,
" आई, आई..!"
माझ्यासाठी
गाणे म्हणशिल..?
आई हसते,
बाळासाठी
पुन्हा रोजचे
गाणे गाते.
सकाळपासुन
दमली राणी
मिटुन पापणी
शांत झोपते...

-पूजा भडांगे

No comments:

Post a Comment