Wednesday 9 September 2015

जोडव्यांची सल. . .


चुलीतला जाळ जरा जास्तच लख्ख होत होता.. इतका की लाल-भगव्या ठिणगीतून मला प्राजक्ताची देठं उडाल्याचा भास होऊ लागला..
हल्ली हे असंच होतं.. नाजूक साजूक असं काही दिसतंच नाही डोळ्यांना..
दिसत नाही की, माझ्या आयुष्यात आता नाजूक म्हणावं असं काही राहीलंच नाही.. माहीत नाही पण, विळीवर धरलेल्या कांद्यासारखं सोलपटून निघायला होतं क्षणोक्षणी... पापणकाठ भरून वाहत राहतो सारखा..

चुलीपुढ्यात बसून पायातल्या  जोडवीची रिकामी झालेली जागा कुरवाळत असताना तू डोळ्यात दाटून येतोस... आगीत एकेक सरपण ढकलावं तसं जळत राहत मनातलं काही.. 
उर भरुन निघालेला एकेक आवंढा विस्तवाच्या धगीने आतल्या आत गुदमरून असतो... पण, फुटत कधीच नाही..

पाण्याच्या निमित्ताने स्वयंपाक घराशी घुटमळणारी तुझी आडदांड छबी उगीच ये-जा करत राहते मग..!
एव्हाना भांड्यातला भात रटरटून वर झाकलेली ताटली फडफडत असतानाच माझी तंद्री तुटणार तोच बाहेर घुंगराची माळ तोडत गेल्यासारखी बैलजोडी दारावरुन ऐटीत धावत जाते.. मी पुन्हा कासाविस... अगतिक.. सैरभैर.. घरटं अकस्मात तुटून पडलेल्या हताश चिमणीसारखी..!

उगीच भास होतो नसलेल्या गोष्टींचा.. श्वासातला उष्मा पेटून उठतो आणि मनातली अस्वस्थता पुन्हा उंब-यात कैद होते...

तू यायची हीच वेळ होती ना...!
दमल्या शरिराने घरात शिरणारा तुझा रुबाब संध्याकाळी घराला कसं घरपण द्यायचा. ओसरीवर वाजलेली पावलं आत शिरायच्या आत पाण्याने भरलेला तांब्या तुझ्यापुढ्यात हजर करत असताना माझा "तू" मला भेटायचास..
चारचौघात अदबीनं, मानानं हाक मार पण, एकांतात "तू" अशी हाक मार असं तूच सांगितलंस ना रे...! डोक्यावरच्या पदराआडून भांगेत भरलेलं कुंकू न्याहाळणारा तू आताशा भेटतंच नाहीस या वेळेला..

मी तो पाण्याचा तांब्या आजही न चुकता भरून ठेवते.. फणेरीपेटीतली कुंकवाची डबीही भरलेलीच असते माझ्या चिमुटभर स्पर्शाशिवाय...

तू जाताना तुझ्या आठवणी किती भरजरी करुन गेलास.. अगदी ह्या उतरवून ठेवलेल्या सगळ्या गडद रंगांसारख्या..
ज्यांना मी डोळाभर पाहूही शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही..!

तूला "तू" म्हटलेलं आवडत म्हणून जन्मात न संपणारा एकांत माझ्या पदराला बांधून गेलास ना..?


पूजा भडांगे बेळगाव 


1 comment:

  1. अप्रतिम.....!!
    मनाची अस्वस्थता खूप छान शब्दात मांडलीय...!!

    ReplyDelete